नवी दिल्ली:
दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने दोन वर्षांनंतर शुक्रवारी जामीन मंजूर केला. त्यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. यानंतर रात्री आठच्या सुमारास सत्येंद्र जैन कागदोपत्री काम पूर्ण करून कारागृहाबाहेर आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह यांच्यासह आम आदमी पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते तेथे उपस्थित होते.
आपला नेता तुरुंगातून बाहेर येत असल्याचे पाहून कार्यकर्त्यांनी पक्ष, अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. जैन बाहेर आल्याचा आनंद नेते व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सत्येंद्र जैन म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांचे काम थांबवण्यासाठी मला अटक करण्यात आली. तर मनीष सिसोदिया म्हणाले की जैन हॉस्पिटलची दुरुस्ती करत होते, रस्ते दुरुस्त करत होते, ही त्यांची चूक होती. त्यामुळे भाजपने त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना इतके दिवस तुरुंगात डांबून ठेवले.
सत्येंद्र जैन यांना जामीन मिळाला असला तरी न्यायालयाने त्यांना देशाबाहेर जाण्यास बंदी घातली आहे.
दिल्ली सरकारचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना 2022 मध्ये दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. दारू घोटाळा प्रकरणात जामीन मिळालेले ते आम आदमी पक्षाचे (आप) चौथे नेते आहेत. यापूर्वी या प्रकरणात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना जामीन मिळाला आहे.